ख्राईस्टचर्च, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात यष्टिरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडल याला संधी देत किवींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यासह भारतीय वंशाच्या इश सोधीला संघात स्थान मिळवण्यात यश आले. मात्र, डॉज ब्रेसवेलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने सर्व चकीत झाले आहेत, परंतु किवींच्या संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांना आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. टेलर हा चार वर्ल्ड कप खेळणारा किवींचा 7 वा खेळाडू ठरणार आहे, तर विलियम्सन, टीम साऊदी आणि मार्टिन गुप्तील यांची ही तिसरी वर्ल्ड कप स्पर्धा आहे. जलदगती गोलंदाजीची जबाबदारी ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांच्यावर असेल. हेन्री आणि फर्ग्युसन सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहेत. मिचेल सँटनर आणि सोधी ही फिरकीची धुरा सांभाळतील. जिमी निशॅम व कॉलीन डी ग्रँडहोम अष्टपैलूच्या भूमिकेत असतील. फलंदाजी विभागात विलियम्सन, गुप्तील, टेलर, कॉलीन मुन्रो, लॅथम, हेन्री निकोल्स यांचा समावेश आहे.
यष्टिरक्षक म्हणून टॉम लॅथम यालाच पहिली पसंती असेल, परंतु ब्लंडलला राखीव यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी जाहीर केलेल्या या संघात 8 खेळाडू प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
न्यूझीलंडचा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना 1 जूनला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.