लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंड संघाने रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि शिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रॅथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रॅथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. या निकालासह न्यूझीलंडने अपराजित मालिका कायम राखली खरी, परंतु त्यांच्या संपूर्ण संघाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
हरुनही 'तो' जिंकला, न्यूझीलंडच्या कर्णधारानंही ब्रेथवेटचा 'खेळ' नवाजला
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात षटकांचा वेग कमी राखल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संपूर्ण संघाला शिक्षा सुनावली. मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी ही शिक्षा सुनावली. आयसीसीनं त्यासंबंधीत जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की,''खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आयसीसीच्या नियम 22.2चे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात येत आहे. षटकांचा वेग संथ राखल्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीमधील 10 टक्के, तर कर्णधार केन विलियम्सनला 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. यापुढे असे पुन्हा घडल्यास विलियम्सनवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.''
न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली. शे होप आणि निकोलस पूरन झटपट बाद झाले. मात्र स्फोटक ख्रिस गेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे वेस्ट इंडिजने लढतीत पुनरागमन केले. पण हेटमायर (54), जेसन होल्डर (0) आणि ख्रिस गेल (87) पाठोपाठ बाद झाल्याने विंडिजचा डाव कोलमडला. मात्र 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कार्लोस ब्रॅथवेटने एक बाजू लावून धरत सामन्यात रंगत आणली. त्याने केमार रॉच, शेल्डन कॉटरेल आणि ओडेंसे थॉमस यांच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या करत विंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. पण विंडीजला सात चेंडूत सहा धावांची गरज असताना एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात ब्रॅथवेट बाद झाला.
तत्पूर्वी कर्णधार केन विल्यमसनने फटकावलेल्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 291 धावा कुटल्या होत्या. वेस्ट इंडियने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर पहिल्याच षटकात न्यूझीलंडला दोन धक्के बसले. मात्र नंतर कर्णधार केन विल्यमसन 148 आणि रॉस टेलर 69 यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडला सुस्थितीत पोहोचवले