बर्मिंगहॅम : कर्णधार केन विलियम्सनच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपली अपराजित मालिका कायम राखताना दक्षिण आफ्रिकेचा ४ गड्यांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ४९ षटकात ६ बाद २४१ धावा केल्यानंतर न्यूझीलंडने ४८.३ षटकात ६ बाद २४५ धावा केल्या. विलियम्सनने संयमी खेळी करताना अखेरपर्यंत नाबाद राहत १३८ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह १०६ धावा केल्या. यासह न्यूझीलंडने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला. एजबस्टन स्टेडियमवर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने आफ्रिकेला मर्यादित धावसंख्येत रोखले. मात्र, धावांचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टील (३५), कॉलिन मुन्रो (९), रॉस टेलर (१), टॉम लॅथम (१), जेम्स नीशाम (२३) हे अपयशी ठरल्याने किवींनी अर्धा संघ १३७ धावांत गमावला. ख्रिस मॉरिसने किवींचे कंबरडे मोडताना ४९ धावांत ३ बळी घेतले. परंतु, विलियम्सनने कॉलिन डी ग्रँडहोमसह सहाव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला सावरले. ग्रँडहोम ४७ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ६० धावा करुन परतला. मात्र विलियम्सनने अखेरपर्यंत नाबाद राहत वैयक्तिक शतक पूर्ण करतानाच संघाचा विजयही साकारला.
तत्पूर्वी, द. आफ्रिकेने समाधानकारक मजल मारली. या दरम्यान हाशिम आमलाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. सलामीवीर क्विंटन डीकॉक (५), कर्णधार फाफ डूप्लेसिस (२३) आणि एडेन मार्करम (३८) अपयशी ठरले. मात्र आमला आणि रॉसी वॅन डेन डुस्सेन यांच्या अर्धशतकांमुळे आफ्रिकेने समाधानकारक मजल मारली. आमलाने ८३ चेंडूत ४ चौकारांसह ५५, तर डुस्सेनने ६४ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६७ धावा फटकावल्या. डुस्सेनने अनुभवी डेव्हिड मिल्लरसह (३६) पाचव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. मिल्लरने ३७ चेंडूत २ चौकर व एका षटकारासह ३६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून फर्ग्युसनने ३ बळी घेतले.
महत्त्वाचे
हाशिम आमला सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला.
आमलाने १७६ डावांत ८ हजार धावा पूर्ण केल्या असून भारताच्या विराट कोहलीने १७५ डावांत ही कामगिरी केली आहे.
३ हजार धावा पूर्ण करणारा केन विलियम्सन तिसरा कर्णधार ठरला.
विलियम्सनने सर्वात कमी १७ डावांत इंग्लंडमध्ये हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम रचला. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या (१८) नावावर होता.
धावफलक
दक्षिण आफ्रिका : ४९ षटकात ६ बाद २४१ धावा (रॉसी वॅन डेन डुस्सेन नाबाद ६७, हाशिम आमला ५५, एडेन मार्करम ३८, डेव्हिड मिल्लर ३६, फाफ डूप्लेसिस २३; लोकी फर्ग्युसन ३/५९.) पराभूत वि.
न्यूझीलंड : ४८.३ षटकात ६ बाद २४५ धावा (केन विलियम्सन नाबाद १०६, कॉलिन डी ग्रँडहोम ६०, मार्टिन गुप्टील ३५, जेम्स नीशाम २३; ख्रिस मॉरिस ३/४९.)
Web Title: ICC World Cup 2019: New Zealand's top spot; South Africa beat by four wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.