लंडन : आपल्या खराब कामगिरीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या श्रीलंका संघाची विश्वचषक स्पर्धेत अंडरडॉग न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी कडवी परीक्षा आहे. सहा वेळा उपांत्य फेरीत पराभूत होणाºया न्यूझीलंडने २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र आॅस्ट्रेलियाने त्यांचे जेतेपदाचे स्वप्न भंग केले होते. सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. मात्र, दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेम्स फ्रॅँकलिन म्हणाला, ‘न्यूझीलंडविषयी कोणीच जास्त बोलत नाही. मात्र आम्ही विश्वचषक जिंकू शकतो असे मला वाटते.’
रॉस टेलर सध्या फॉर्ममध्ये असून त्याने वर्षभरात ९०च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत. त्याच्या जोडीला केन विल्यम्सन, मार्टिन गुप्टील सारखे धोकादायक फलंदाज आहेत. ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅँडहोम व टीम साऊदी यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. ईश सोढी व मिशेल सेंटनेर फिरकीचे आक्रमण सांभाळतील.
दुसरीकडे श्रीलंकेचा नवीन कर्णधार दिमुथ करुणारत्ने चार वर्षानंतर संघात परतला आहे. मागील नऊ एकदिवसीय सामन्यापैकी आठ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माजी कर्णधार महेला जयवर्धने म्हणाला, ‘श्रीलंकेने विश्वचषक स्पर्धेत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे.’