लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडनं रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडवर चौकारांच्या फरकानं विजय मिळवून प्रथमच वर्ल्ड कप उंचावला. क्रिकेटप्रेमींची उत्कंठा वाढवणारा हा सामना निर्धारित 50 षटकांत 241-241 असा बरोबरीत सुटला, त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही 15-15 अशी बरोबरी राहिली. त्यामुळे सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी जाहीर करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी ) वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून एक संघ घोषित केला. त्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला डच्चू देण्यात आला. त्यात आता लिटल मास्टर व महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कोहलीला संघात न घेण्याचाच निर्णय घेतला आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक 648 धावा करणारा फलंदाज ठरला, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 647 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनेही सर्वाधिक 27 विकेट्स घेत विश्वविक्रम केला. यांच्याशिवाय बेन स्टोक्स, शकिब अल हसन आणि हार्दिक पांड्या यांनीही अष्टपैलू कामगिरी करून सर्वांचे मनोरंजन केले. या कामगिरीच्या जोरावर गावस्कर यांनी त्यांच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघ जाहीर केला. त्यात रोहित व वॉर्नर यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे, तर जोर रूट व केन विलियम्सन हे मधल्या फळीतील जबाबदारी सांभाळतील. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स केरीचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
गावस्कर यांचा वर्ल्ड कप संघ
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, जो रूट, केन विलियम्सन, शकिब अल हसन, अॅलेक्स केरी, बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह
सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड कप संघात विराट कोहलीला कर्णधारपद नाही!
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानंही अंतिम सामन्या दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड करून एक संघ जाहीर केला होता. त्यात विराटने स्थान पटकावलेय खरे, परंतु कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे न सोपवण्याचा निर्णय तेंडुलकरने घेतला. . तेंडुलकरच्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व जॉनी बेअरस्टो यांची निवड करण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि कोहली यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी असेल, तर बांगलादेशचा शकिब अल हसन, इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि भारताचा हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे चार अष्टपैलू खेळाडू या संघात आहेत. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांच्यावर जलद माऱ्याची जबाबदारी असेल.
Web Title: ICC World Cup 2019 : No Virat Kohli in Sunil Gavaskar's best XI of World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.