लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने रविवारी विश्वचषकाला गावसणी घातली. न्यूझीलंडनेही त्यांना कडवी झुंज दिली. या दोन्ही संघांतील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पण तरीही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगावान गोलंदाज जसप्रीत बुमराच अव्वल असल्याचे पाहायला मिळाले आहे.
विश्वचषकानंतर आयसीसीने आपला संघ जाहीर केला. विश्वचषकातील सर्वोत्तम संघात कोहलीचे नावही नव्हते. पण तरीही आयसीसीच्या यादीमध्ये कोहली अव्वल स्थानावर विराजमान असल्याचे पाहायला मिळाले. विश्वचषकानंतर आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमावारीत फलंदाजांच्या यादीमध्ये कोहलीने 886 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचाच रोहित शर्मा आहे. रोहितच्या नावावर 881 गुण आहेत. या क्रमवारीत रॉस टेलरनंतर सहाव्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराने 809 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत अव्वल पाच जणांमध्ये भारताचा एकही गोलंदाज नाही. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रने न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहे.
अष्टपैलू क्रमवारीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन हा पहिल्या स्थानावर कायम आहे. या क्रमवारीत इंग्लंडच्या विश्वविजयात सिंहाचा वाटा उचलणार बेन स्टोक्स हा दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर अफगाणिस्तानचे मोहम्मद नबी आणि रशिद खान हे खेळाडू आहे. या क्रमवारीत चौथ्या स्थानावर पाकिस्तानचा इमाद वासिम आहे.
आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही विश्वचषकाची अंतिम फेरी झाल्यानंतर आयसीसी या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा एक संघ बनवते. यावेळीही आयसीसीने विश्वचषकातील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. पण या संघात सध्याच्या घडीला यशोशिखरावर समजल्या जाणाऱ्या भारताच्या विराट कोहलीचे नाव नसल्याचे पुढे आले आहे.आयसीसीने जाहीर केलेल्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या या संघात जास्त आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, लुकी फर्ग्युसन यांचा समावेश करण्यात आला आहे, तर ट्रेंट बोल्टला बारावा खेळाडू ठेवला आहे.
आयसीसीच्या संघात इंग्लंडच्या जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि अॅलेक्स कॅरी यांना संघात स्थान दिले आहे. या विश्वचषकात दमदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शकिब अल हसन याचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.