लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक सुरु झाला आहे. या विश्वचषकात सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्या भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानमध्ये एक जाहिरात करण्यात आली आहे. वर्ल्ड कप जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर केला गेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला असून आता त्याचा बदला घ्यायला हवा, असे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानी चॅनेलनं पातळी सोडलीविश्वचषक स्पर्धेत सहावेळा भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्ताननं पातळी सोडणारी जाहिरात तयार केली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे. यंदाचा वर्ल्डकप आमचाच असेल, असा संदेश देणारी आक्षेपार्ह जाहिरात पाकिस्तानमधील वाहिनीनं तयार केली आहे.
येत्या रविवारी (16 जून) भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत सहावेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. मात्र सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. यानंतर आता 16 जूनच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या एका वाहिनीनं एक आक्षेपार्ह जाहिरात तयार केली. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आली आहे.
27 फेब्रुवारीला अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते चहा पित असताना दिसत होते. याच व्हिडीओच्या धर्तीवर पाकिस्तानी वाहिनीनं एक जाहिरात तयार केली. यामध्ये अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पित आहे. त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. टॉस जिंकल्यावर काय करणार, कोणत्या अकरा खेळाडूंना संधी मिळेल असे प्रश्न त्या व्यक्तीला विचारण्यात आले. 'मी हे तुम्हाला सांगू शकत नाही', अशी अभिनंदन यांनी दिलेली उत्तरं जाहिरातीमधील व्यक्तीनं दिली.
यानंतर जाहिरातीमधील अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितलं जातं. ती व्यक्ती चहाचा कप घेऊन तिथून जाऊ लागते. तितक्यात त्या व्यक्तीला कप घेऊन कुठे चाललास, असा प्रश्न विचारण्यात येतो. या ठिकाणी चहाच्या कपचा आधार घेत वर्ल्डकपवर भाष्य करण्यात आलं आहे. जाहिरात तयार करताना पाकिस्तानी वाहिनीनं पातळी सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.