- प्रसाद लाडमुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अति शहाणा, त्याचा बैल रिकामा. ही म्हण भारतीय क्रिकेट संघाला चपखल बसणारी अशीच. अतिआत्मविश्वास, बेमुर्वतखोरपणा ठासून भरलेला भारतीय संघ अखेर विश्वचषकातून बाहेर पडला. आयपीएलवर पोसलेल्या आणि टेलिव्हिजन पाहून तज्ज्ञ झालेल्या चाहत्यांवर काल दु:खाचा डोंगर कोसळला. अजूनही त्यांच्या भावना ढिगाऱ्याखाली दबलेल्याच आहेत. सहजपणात प्रवीण असल्याचे दाखले आपण बऱ्याचदा दिलेले आहेत. महत्त्वाच्या सामन्यात जास्त प्रयोग न करता बेसिक्सवर लक्ष देण्याची गरज असते आणि तेच भारतीय संघ विसरला. आता स्वत:ला क्रिकेट पंडित समजणारे, पण कधीही लेदर बॉलने क्रिकेट न खेळलेले महेंद्रसिंग धोनीला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. धोनीच्या नावाची ओरड करून आपल्याला किती कळतं, हे दाखवण्याचा भाबडा प्रयत्न करत आहेत. पण धोनीला अपशब्द वापरण्यापूर्वी परिस्थिती काय होती आणि संघ व्यवस्थापनाला धोनीचे वावडे का होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
धोनी हा एकेकाळी सर्वोत्तम मॅच फिनिशर होता. अखेरच्या षटकापर्यंत तो सामना घेऊन जायचा आणि प्रतिस्पर्धी संघाच्या दाढेतून सामना बाहेर काढायचा. ते कसब धोनीकडे होते. पण एवढे क्रिकेट खेळल्यानंतर आणि वयपरत्वे धोनीच्या खेळात बदल झाला. काही महिन्यांपूर्वी धोनीचा मणका दुखावल्याची गोष्टही समोर आल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच महेंद्रसिंग धोनी निर्मित 'हेलिकॉफ्टर शॉट' त्याने शेवटचा कधी खेळला हे तुम्हाला आठवतही नसेल. वयानुसार तुमची खेळाची शैली बदलते, तशी धोनीचीही काहीशी बदलली. धोनी हा संघातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहेच, त्यात वाद नाहीच. पण धोनीचा खेळ बदलला आहे आणि त्यानुसार त्याच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये बदल करणे क्रमप्राप्त होते. या गोष्टीचा विचार जर भारतीय संघ व्यवस्थापनाने केला असता तर उपांत्य फेरीचा निकाल वेगळा लागण्याची शक्यता होती.
तुम्ही न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना पाहिला असेल, त्याचबरोबर तुम्ही २०११च्या विश्वचषकातील अंतिम फेरीचाही सामना पाहिला असेल. दोन्ही सामन्यांमध्ये एक साम्य होते, ते म्हणजे भारताचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यावेळी फॉर्मात असलेल्या युवराजला न पाठवता धोनी स्वत: मैदानात उतरला होता. कारण दडपण हाताळण्यात धोनीचा हात कोणीही धरू शकणार नाही. २०११च्या विश्वचषकासारखी परिस्थिती यावेळीही होती. पण यावेळी फक्त एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे भारताची कप्तानी. जर धोनी यावेळी कर्णधार असला असता तर नक्कीच चौथ्या क्रमांकावर आला असता. पण हीच गोष्ट क्रिकेट गुरू रवी शास्त्री यांना कळू नये, हे भारतीय संघाचे दुर्दैव.
उपांत्य फेरीत भारताची ३ बाद ५ अशी दयनीय अवस्था होती. त्यावेळी डावाला आकार देणारा खेळाडू खेळपट्टीवर असायला हवा होता. भारताने त्यावेळी चौथ्या क्रमांकासाठी रिषभ पंतची निवड केली. या पंतांना स्वत:च्या फलंदाजीवर विश्वास नाही. कधी विकेट बहाल करू, हे ज्यांना कळत नाही त्याला भारताने चौथ्या क्रमांकाची मोक्याची जागा दिली. पंत आणि पंड्यासारखी मंडळी आयपीएलवर पोसलेली आहेत. त्यांना डावाला आकार देणे, हा प्रकारच माहीत नाही, हे शास्त्री यांना माहीत नसावे, हेही दुर्दैव. पंतनंतर कार्तिकला (ज्याची संघात निवडच का केली, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही) फलंदाजीला पाठवले. त्यांनी पहिले १८ चेंडू निर्धाव सोडले. २५ चेंडू ६ अशी त्यांची 'देदीप्यमान' खेळी साऱ्यांनीच पाहिली. पंत आणि पंड्या यांची जोडी जमत होती. ही जोडी आता अनमोल रत्न ठरणार, असे वाटत होते. पण तसे होणार नव्हते, कारण दोघांनाही 'एरियल स्ट्राइक' करण्याचे व्यसन आहे. 'एरियल स्ट्राइक' करायची वेळ असते आणि ती वेळ पाळायची असते. पण व्यसनाधीन माणसं जास्त काळ शांत बसू शकत नाहीत, तसेच त्यांचे झाले. गरज नसताना हवेत फटके मारत यांनी आपल्या विकेट न्यूझीलंडला बहाल केल्या आणि अखेर मैदानात धोनीला सातव्या क्रमांकावर शास्त्री-कोहली यांनी पाठवले, जे अपचनीय आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फक्त आणि फक्त धोनीलाच पाठवायला हवे होते. कारण त्यावेळी धोनी डावाला चांगला आकार देऊ शकला असता. कारण मातीला आकार कुंभार चाकावर देतो, भट्टीत त्याचा आकार बदलला जात नाही. तसंच सुरुवातीला डावाला आकार दिला जातो. सातव्या क्रमांकावर येऊन डावाला आकार देता येत नाही, हे समजून घ्यायला हवे. चौथ्या क्रमांकावर येऊन धोनीने २५ षटकांपर्यंत जर स्थिरस्थावर व्हायला वेळ जरी घेतला असता तरी त्यानंतरची २५ षटके सामना भारताच्या हातात राहिला असता. आता हे एवढं रामायण सांगूनही काही पालथ्या घड्यावर पाणी पडावं, तसंच झालं असेल. सरतेशेवटी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन उपांत्य फेरीतील विजयानंतर काय म्हणाला ते पाहा. विल्यमसन म्हणाला की, " धोनी हा एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. धोनी आणि जडेजा यांचे सामन्यातील योगदान सर्वात महत्त्वाचे ठरते. धोनी फलंदाजीला आला आणि दोन्ही संघांतील खेळाडूंपेक्षा तो चेंडूचा समर्थपणे सामना करत होता. जर धोनीने नागरिकत्व बदललं तर त्याला आम्ही न्यूझीलंडच्या संघात घेऊ." प्रतिस्पर्धी कर्णधाराने विजयानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचे गोडवे गाणे, हे दुर्मीळंच. त्यामुळे तुम्ही कोणावर कोणत्या दर्जाची टीका करता, याचा विचार करता आला तर पाहा. कारण या धोनीनेच तुम्हाला दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली आहे. फक्त राजकारणाचा तो बळी ठरतोय आणि हे राजकारण नेमकं कोण करतंय, हे सांगणे न बरे.
विश्वचषकात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी भारतीय संघाने प्रयोगशाळा भरवली होती. राहुल-शंकरचा प्रयोग सुरू असताना पंड्या आणि पंत यांनाही यामध्ये भरडले गेले. पण त्याचा फायदा काय झाला? चौघांपेक्षा एकही फलंदाज चौथ्या स्थानाला न्याय देऊ शकला नाही. कारण प्रत्येकवेळी या क्रमांकावर उचलबांगडी सुरू होती. याच चौथ्या स्थानावर धोनीला कायम ठेवले असते तर भारतावर ही वेळ आली नसती. पण यामध्ये धोनी मोठा झाला असता, जसा तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मालिकावीर झाल्यावर झाला होता. काहींना त्यावेळी मिरच्या झोंबल्या होत्याच. आपल्यापेक्षा कुणीही मोठं होऊ नये, असं काही जणांना वाटतं होतंच. त्यामध्ये स्वत:चे हित किती आणि संघभावना किती, हे सांगणेच न बरे. कोहली-शास्त्री जोडीची धोनीला चौथ्या क्रमांकाला पाठवण्याची चूक फक्त भारतीय संघालाच भोवलेली नाही, तर तमाम भारतीय चाहत्यांच्या भावनांशी त्यांनी खेळ केला आहे. आता जे धोनीच्या निवृत्तीची मागणी करत आहेत, ते शास्त्री आणि कोहली यांच्यावर कोणतीच टीका करत नाहीत. का? या पराभवाची जबाबदारी त्यांनी घ्यायला नको का? हाच कळीचा मुद्दा आहे.