ब्रिस्टल : यजमान इंग्लंडला नमवून विजयाची चव चाखणारा पाकिस्तान विश्वचषकात शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. वेस्ट इंडिजकडून सलामीला पराभूत झालेल्या पाकने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा १४ धावांनी पराभव केला होता. ‘आम्ही तिन्ही विभागात सरस कामगिरी केली. असाच खेळ कायम राहिल्यास आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो,’ असे सांगून प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सातत्याने दमदार कामगिरी करण्याचे खेळाडूंना आवाहन केले.
इंग्लंडविरुद्ध पाककडून फलंदाजीत मोहम्मद हाफिज, बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी चमक दाखविली तर गोलंदाजीत वहाब रियाज, मोहम्मद आमीर आणि शादाब खान यांनी भेदक मारा केला होता. पाक संघात मला विजयाची भूक जाणवत असल्याने सांगून आर्थर म्हणाले, ‘हीच कामगिरी पुढेही सुरू असायला हवी.’ पाकने श्रीलंकेविरुद्ध १९७५ पासून विश्वचषकात सातही सामने जिंकले आहेत.दुसरीकडे न्यूझीलंडकडून लंकेला दहा गड्यांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. पावसाच्या व्यत्ययातील दुसºया सामन्यात मात्र लंकेने अफगाणिस्तावर विजय साजरा केला होता. लंकेला पाकविरुद्ध मधल्या फळीचे अपयश टाळावे लागेल. या संघाने न्यूझीलंडविरुद्ध अर्धा संघ १४ धावांत गमावला होता. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी ३६ धावांत सात फलंदाज गामवले होते. लंकेचे प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघे म्हणाले,‘मला फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. त्यांना धावा काढाव्याच लागतील.’
१) दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत १५३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी पाकिस्तानने ९०, तर श्रीलंकेने ५८ सामने जिंकले असून १ सामना टाय झाला आहे. याशिवाय ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.
२) दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील सर्व सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
३) दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये १९७५ पासून आतापर्यंत सात सामने झाले असून त्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळविलेला आहे.
४) पाकिस्तान आणि श्रीलंकाने आतापर्यंत प्रत्येकी एक वेळा विश्वचषक जिंकला आहे.
५) विश्वचषकामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ३३८ तर श्रीलंकेने पाकिस्तानविरूद्ध २८८ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.
६) पाकिस्तानची श्रीलंकेविरुद्ध २१६ धावांची, तर श्रीलंकेची पाकविरुद्ध १३८ धावांची निचांकी आहे.