Join us  

ICC World Cup 2019 : आयसीसीलाही वाटू लागलंय वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकणार, का ते जाणून घ्या?

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने अनपेक्षित भरारी घेताना बुधवारी न्यूझीलंडवर विजय मिळवला. पाकिस्तानने आतापर्यंत स्पर्धेत अपराजित असलेल्या किवींवर 6 विकेट राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 1:23 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने अनपेक्षित भरारी घेताना बुधवारी न्यूझीलंडवर विजय मिळवला. पाकिस्तानने आतापर्यंत स्पर्धेत अपराजित असलेल्या किवींवर 6 विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही जीवंत आहेत. उर्वरित लढतीत त्यांना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा सामना करायचा आहे. सध्याचा फॉर्म पाहता ते या लढतीत विजय मिळवतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.  पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. सुरुवातीला याकडे योगायोग म्हणून पाहिले गेले, परंतु पाक संघाची कामगिरी पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) यंदाचा वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकतो की काय, असे वाटू लागले आहे.

पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत अपराजित असलेल्या न्यूझीलंडला पराभवाची चव चाखवली. गोलंदाजांचा अचूक मारा आणि फलंदाजांची साजेशी साथ याच्या जोरावर पाकने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. शाहिन आफ्रिदीनं 3 महत्त्वाच्या विकेट्स घेत किवींना धक्का दिला, परंतु जिमी निशॅम ( 97*), कॉलिन  डी ग्रँडहोम ( 64) आणि कर्णधार केन विलियम्सन ( 41) यांनी संघाला 237 धावांचा पल्ला गाठून दिला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. पण, बाबर आझम ( 101*) आणि हॅरिस सोहेल ( 68) यांनी दमदार खेळ करून संघाला विजय मिळवून दिला.

सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे सर्वाधिक चार सामने शिल्लक आहेत आणि ते 9 गुणांसह तिसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. 1992च्या वर्ल्ड कप प्रमाणे पाकिस्तान संघाला यंदा पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विजय व पावसामुळे सामना रद्द, सलग दोन पराभव आणि आता सलग दोन विजय अशी वाटचाल सुरू आहे. 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तान