लंडन - आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या उपांत्य फेरीतील तीन संघ आता निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलिया भारत यांच्यापाठोपाठ आता यजमान इंग्लंडच्या संघानेही उपांत्य फेरी गाठली आहे. या तीन संघांसोबतच न्यूझीलंडही उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानलाही उपांत्य फेरी गाठण्याची अंधुकशी संधी अद्यापही आहे. मात्र त्यासाठी त्यांना अशक्य ते शक्य करून दाखवावे लागणार आहे.पाकिस्तानच्या खात्यात सध्या 9 गुण असून, शेवटच्या साखळी लढतीत त्यांनी बांगलादेशवर विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. मात्र न्यूझीलंडच्या नेट रनरेटपेक्षा सरस रनरेट गाठण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सध्या न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +0.175 तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा -0.792 आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली किंवा बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले तरच त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी हालचाली करता येतील. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास पाकिस्तानचा संघ एकही चेंडू खेळण्याआधीच वर्ल्डकपमधून बाहेर पडेल. प्रथम फलंदाजी करताना खालील तीन परिस्थितीतील समीकरणांना साजेसा विजय मिळवल्यासच पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल. जर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत विजयासाठी किमान 350 धावा फटकवाव्या लागतील. तसेच 350 धावा फटकावल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला तरच पाकिस्तान उपांत्यफेरीत प्रवेश करू शकेल. दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल. तर तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानसा प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण
ICC World Cup 2019 : तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण
इंग्लंडने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र शेवटच्या लढतीत चमत्कारिक विजय मिळवल्यास त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 9:40 AM