लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला पराभूत करत पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवला. वेस्ट इंडिजकडून लाजीरवाणा पराभव पत्करलेला पाकिस्तानचा संघ बलाढ्य इंग्लंडला नमवेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण, त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांना बेभरवशी का म्हणातात याची प्रचिती दिली. त्यामुळे श्रीलंकाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्यांची कामगिरी कशी होते, याची सर्वांना उत्सुकता होती. पण, नियतीचा खेळ काही वेगळाच होता. मुसळधार पावसामुळे पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समसामान एका गुणावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानसाठी मात्र हा निकालही शुभसंकेत घेऊन आला आहे. आजच्या या निकालाने त्यांच्या जेतेपदाच्या आशा अधिक वाढल्या आहेत, कसे? चला जाणून घेऊया..
पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने त्यांच्यावर 7 विकेट व 218 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 105 धावांत गुंडाळून विंडीजने हे लक्ष्य 13.4 षटकांत सहज पार केले. ख्रिस गेलने खणखणीत अर्धशतक झळकावले. या पराभवानंतर पाक संघावर चहुबाजूने टीका होत आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडूही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रचंड नाराज होते. पण, त्यांनी दुसऱ्या सामन्यांत त्यांनी यजमान इंग्लंडविरुद्ध दमदार कमबॅक केले. तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 348 धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडला यशस्वीपणे करता आला नाही आणि पाकिस्तानने 14 धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला.
1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात विंडीजकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवत कमबॅक केले. पण, इंग्लंडविरुद्ध 74 धावांवर ऑलआऊट होऊनही तिसरा सामना रद्द झाला होता. या सामन्यात तीन तास पावसाने फटकेबाजी केली होती. त्यामुळे तो रद्द करण्यात आलेला. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहितच आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रमक केला होता. इम्रान खानचा यशाचा तोच कित्ता गिरवण्याचे स्वप्न पाहत आहेत आणि तसे संकेतही पाकिस्तानला मिळत आहे. बघुया हे संकेत खरे ठरतात की बाजी दुसराच कोणीतरी मारून जातो....
1979 साली वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द झाला होता, तर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द झाला होता. विशेष म्हणजे या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये अनुक्रमे विंडीज आणि ऑसी संघाने बाजी मारली होती. 2019 मध्ये पाकिस्तान जिंकतो की श्रीलंका हे 14 जुलैलाच कळेल.