लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचा 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषकात मृत्यू झाला होता. यंदाच्या विश्वचषकात अशी एक दुर्दैवी गोष्ट होणार होती, पण ती घडली नाही. पाकिस्तानचे विद्यमान प्रशिक्षक मिकी आर्थर हे गेल्या रविवारी आत्महत्या करणार होते. ही गोष्ट दस्तुरखुद्द आर्थर यांनीच सांगितली आहे. या गोष्टीचा पुरावा म्हणून एक व्हिडीओही प्रसिद्ध झालेला आहे.
खेळाडू आणि प्रशिक्षक हे व्यावसायिक असतात, असे म्हटले जाते. पण तरीही त्यांना आपल्या भावना लपवता येत नाहीत. एखादी वाईट गोष्ट घडली की दडपण येते किंवा काही वेळा अशी जहरी टीका होते की, तुम्हाला ते पद नकोसे वाटायला लागते. गेल्या रविवारीही आर्थर यांच्याबाबत असेच काहीसे घडले होते.
पाकिस्तानचा संघ सर्वात बेभरवश्याचा मानला जातो. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. पहिल्याच सामन्यातील पाकिस्तानची कामगिरी पाहून, आता हे बाद फेरीत पोहोचू शकणार नाही, अशी भाकितं करायला सुरुवात केली होती. पण त्यानंतरच्याच सामन्यात पाकिस्तानने विश्वचषकाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडवर विजय मिळवला होता. त्यामुळे या पाकिस्तानच्या संघाचे प्रशिक्षकपद म्हणजे काटेरी मुकुट असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानचे प्रशिक्षक आर्थर हे एका पत्रकार परिषदेमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी, " आपण गेल्या रविवारी आत्महत्या करणार होतो," असे विधान केले आहे. गेल्या रविवारी पाकिस्तानचा भारताबरोबर सामना होता आणि त्यांना हा सामना गमवावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या संघावरील दडपण वाढले होते. त्यावेळी आर्थर यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता.
हा पाहा व्हिडीओ