लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. त्यात भारताकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर खेळाडूंवर चाहत्यांचा रोष वाढत चालला आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. पाच सामन्यांत त्यांना केवळ एकच विजय मिळवता आला आहे आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. उपांत्य फेरीचे आव्हान टिकवण्यासाठी त्यांना उर्वरित चार सामन्यांत विजय मिळवावा लागेल. शुक्रवारी एका चाहत्याने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा अपमान केला आणि तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंच्या फिटनेसचा मुद्दा फार गाजला. लंडनला रवाना होण्यापूर्वीच पाकच्या माजी खेळाडूंनी डाएट प्लानवर नाराजी प्रकट केली होती. शोएब अख्तरनेही सर्फराजला ढेरपोट्या व बिनडोक असे म्हटले होते. चुकीचे निर्णय, क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा यामुळे पाक खेळाडूंवर टीका सुरुच आहे. शुक्रवारी अशाच प्रसंगाला सर्फराजला सामोरे जावं लागलं.
पाहा व्हिडीओ...
सर्फराजला संघाबाहेर करा; चाहत्यांची मागणीभारतीय संघाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानात राष्ट्रीय संघाबाबत रोष आहे. नाणेफेक जिंकल्यानंतरही गोलंदाज काही करू शकले नाहीत, शिवाय फलंदाजही फ्लॉप झाले. सलामी जोडी फुटताच फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटरवर ‘सर्फराजला परत बोलवा’ हा ट्रेंड सुरू आहे.
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते रागात असून कर्णधार सर्फराज अहमद याला ते यापुढे संघात पाहू इच्छित नाहीत. एका चाहत्याने आपली निराशा व्यक्त करताना लिहिले, ‘सर्फराज संघात का आहे? यष्टिरक्षक म्हणून त्याने तीन झेल आणि एक यष्टीचीत सोडले. फलंदाज म्हणून गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. कर्णधार या नात्याने क्षेत्ररक्षण कसे सजवावे हे देखील त्याला माहीत नव्हते.’