लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. या गोष्टीचा प्रत्यय पाकिस्तानने या विश्वचषकात आणून दिला. पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानने तिनशे धावांचा आकडा पार केल्याचे पाहायला मिळाले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक घडीला पाकिस्तानचा एक तरी स्थिरस्थावर झालेला फलंदाज खेळपट्टीवर असल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचे शतक झाले नसले तरी मात्र त्यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तरी त्यांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. पण त्यानंतर बाबर आझम(63), मोहम्मद हाफिझ (84) आणि कर्णधार सर्फराझ अहमद (55) यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाची धावगती वाढवली.