लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अंधुकशा आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची वाटचाल 1992च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाप्रमाणेच सुरू होती. त्यामुळे यंदाही 1992ची पुनरावृत्ती होणार अशी भाबडी आशा चाहत्यांना होती. पण, तसे झाले नाही. अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानच्या खात्यात 11 गुण होतील. म्हणजेच न्यूझीलंड व पाकिस्तान यांचे समान गुण राहतील, परंतु नेट रनरेटच्या जोरावर किवी संघ उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. पाकिस्तानच्या या अपयशासाठी माजी गोलंदाज शोएब अख्तरने खेळाडूंनाच जबाबदार धरले आहे.
तो म्हणाला, ''पाकिस्तानच्या या अपयशामागे दुसऱ्या कोणाचा हात नसून ते स्वकर्मानेच स्पर्धेबाहेर गेले आहेत. वेस्ट इंडिजकडून झालेला पराभव, पावसामुळे एका गुणावर मानावे लागलेले समाधान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव, यामुळे पाकिस्तान संघ स्पर्धेबाहेर गेला. विंडीजविरुद्ध संघाने शरणागती पत्करली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकण्यासारखा होता. खेळाडूंनी स्वतःहून संघासाठी खड्डा खोदला. त्यामुळे यासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरणे चुकीचे ठरेल.''
शोएब पुढे म्हणाला,''1992च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती होईल अशी मलाही अपेक्षा होती. पण, तसं झालं नाही. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत आला असता तर स्पर्धेचा TRP अधिक वाढला असता. पाकिस्तानचा संघ कोणत्याही स्पर्धेला TRP मिळवून देणारा संघ आहे. ''
तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण बांगलादेशविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली किंवा बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले तरच त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी हालचाली करता येतील. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास पाकिस्तानचा संघ एकही चेंडू खेळण्याआधीच वर्ल्डकपमधून बाहेर पडेल. प्रथम फलंदाजी करताना खालील तीन परिस्थितीतील समीकरणांना साजेसा विजय मिळवल्यासच पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल.
- जर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत विजयासाठी किमान 350 धावा फटकवाव्या लागतील. तसेच 350 धावा फटकावल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला तरच पाकिस्तान उपांत्यफेरीत प्रवेश करू शकेल.
- दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल.
- तर तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानसा प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.