नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची उत्सुकता वाढत चालली आहे. अनेक माजी खेळाडूंनी त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेतील दावेदार सांगितले आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही वर्ल्ड कप संघातील उपांत्य फेरीतील चार संघ सांगितले आहेत. अनेकांच्या मते भारत आणि यजमान इंग्लंड हे या शर्यतीत आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे संघ या स्पर्धेत आश्चर्यकारक निकालाची नोंद करू शकतात, असाही अनेकांचा दावा आहे.
2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 2019च्या स्पर्धेत भारताचे पारडे जड असल्याचे गांगुलीला वाटते. शिवाय या स्पर्धेत सर्वच संघ तुल्यबळ असल्याचे मत व्यक्त करताना भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील, असे गांगुलीने सांगितले.
तो म्हणाला,''भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पण, भारत हा जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल. यंदाचा वर्ल्ड कप हा चुरशीचा होणार आहे. अन्य स्पर्धांप्रमाणे येथेही भारताचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. हा वर्ल्ड कप सर्वोत्तम असेल. यापैकी सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ही स्पर्धा सोपी नक्की नसेल.''
2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर यजमान इंग्लंडची कामगिरीही उल्लेखनीय झालेली आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने आठमध्ये केवळ एकच वन डे मालिका गमावलेली आहे. या वाटचालीत त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांना त्यांच्या भूमीवर नमवले, तर मायभूमीत वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यावर विजय मिळवला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानेही मालिका विजयाचा धडाका लावला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्या घरी नमवले, परंतु मायभूमीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली आहे. पाकिस्ताननेही नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 5-0 असा दणदणीत विजय साजरा केला. त्यामुळे त्यांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे.