मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ 11 गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 268 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात हार्दिक पांड्याच्या खेळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यानं 46 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीनंतरही पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रजाकनं त्याच्यावर नारीज प्रकट केली. हार्दिकच्या खेळीत त्रूटी काढून त्याला आणखी प्रशिक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी मी तयार आहे, असेही रजाक म्हणाला.
पाकिस्ताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या रजाकनं म्हटलं की,''हार्दिक पांड्याची फलंदाजी आज मी निरखून पाहिली आणि त्याच्या खेळीत अनेक चुका असल्याचे मला जाणवले. त्याच्या बॉडी बॅलेंसच चुकीचा आहे. फुटवर्कवर काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याला माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्याला मी प्रशिक्षक देऊ शकतो. त्याला मी जगातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनवू शकतो. बीसीसीआयची तशी इच्छा असल्यास मी त्याला प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहे.''