लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आम्ही पाचशे धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या कर्णधार सर्फराज अहमदला शुक्रवारी तोंडघशी पडावे लागले. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध त्यांना जेमतेम 9 बाद 315 धावा करता आल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानला 316 धावांच्या फरकानं विजय मिळवण्याची आवश्यकता होती आणि तेही त्यांना करता आले नाही. आता त्यांना बांगलादेशचा संपूर्ण संघ 7 धावांवर माघारी पाठवावा लागेल आणि तसे होणे अशक्य आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते बाद झाल्यात जमाच आहे. उपांत्य फेरीत आता न्यूझीलंडचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपांत्य फेरीत प्रवेश पक्का करण्यासाठी पाकिस्तानला 50 षटकांत किमान 350 धावा कराव्या लागणार होत्या शिवाय बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागणार आहे. दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागणार होत्या आणि बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला 450 धावा करून बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागणार आहे. पण, पाकिस्तानला यापैकी एकाही धावांच्या आसपास पोहोचता आले नाही. त्यामुळे त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे.
फाखर जमान ( 13) स्वस्तात माघारी परतल्यानंतर इमाम उल हक व बाबर आझम यांनी 157 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. बाबरने अर्धशतकी खेळी करून नवा विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. जावेद मियादाँद यांचा 1992च्या वर्ल्ड कपमधील 437 धावांचा विक्रम त्याने मोडला. मात्र, त्याला शतकानं हुलकावणी दिली. त्यानं 98 चेंडूंत 96 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 474 धावा केल्या आहेत.