लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या विजयाने सुरू झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आज वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे दोन बेभरवशी संघ समोरासमोर येणार आहेत. या संघांची कामगिरी कशी होईल, याचा अंदाज भल्याभल्यांना बांधता येत नाही. त्यामुळे त्यांना बेभरवशी हा टॅग लागला आहे. पण, याच टॅगमुळे अन्य संघ आम्हाला घाबरत असल्याचा दावा पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने केला आहे. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदातून प्रेरणा घेण्याचा पाकिस्तान संघ प्रयत्न करेल. स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाने 4-1 ने पराभूत केले होते, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामी लढतीत भारताविरुद्ध 124 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने त्यानंतर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि भारताचा पराभव करत जेतेपद पटकावले. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीही पाकिस्तान संघाला 10 वन डे सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. सराव सामन्यातही त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
सर्फराज म्हणाला,''बेभरवशी हा ठपका लागल्याचा आनंद आहे. त्यामुळे पाकिस्तानला अन्य संघ घाबरतात. पाकिस्तान संघ तसा घातकीच आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये आम्हाला बेभरवशी या टॅगसह दाखल होण्याचा आनंदच आहे. याने आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी ऊर्जा मिळते.''
ट्रेंट ब्रिजवर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गतवर्षी इंग्लंडने याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती. पाकिस्ताननेही येथे मागील महिन्यात त्यांच्या वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम ( 340) धावा चोपल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल, आंद्रे रसेल, एव्हिन लुईस, शाय होप, कार्लोस ब्रेथवेट आदी खेळांडूंकडून आज चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहेत.