लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्डकप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले आहे. भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी तो आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करण्यात मग्न होता. पण सध्याच्या भारताच्या विश्वचषकाच्या संघात त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
आता खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही दिवसांपूर्वी या खेळाडूने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये या खेळाडूने आपल्या मित्रांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो भारताने 2011 साली जेव्हा विश्वचषक जिंकला होता त्यावेळी केलेल्या सेलिब्रेशनचा आहे, असे त्याने म्हटले आहे. तो खेळाडू आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या.
भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, विजय शंकर 'ती' उणीव भरू शकत नाही; गंभीरनं व्यक्त केली चिंता
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड केली आहे. पण, निवड समितीच्या या संघावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघावर आपले मत व्यक्त केले. सर्वोत्तम खेळाडूंचा हा संघ असल्याचे तो म्हणाला, परंतु त्याने एक चिंता व्यक्त केली. भारताला इंग्लंडमध्ये चौथ्या जलदगती गोलंदाजाची उणीव जाणवणार आणि हार्दिक पांड्या किंवा विजय शंकर ती भरून काढू शकत नाही, असे ठाम मत त्याने व्यक्त केले.
तो म्हणाला," वर्ल्ड कप कोण जिंकेल हे सांगणे अवघड आहे. स्पर्धेचा फॉरमॅट बदलल्याने सर्व संघांना समान संधी आहे. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल, तो उत्तरार्धात यशस्वी होईलच असे नाही. सातत्य राखणे हे गरजेचे आहे. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्हन स्मिथ परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. इंग्लंडला घरच्या प्रेक्षकांचा फायदा आहे. त्यामुळे सर्वोत्तम संघच बाजी मारेल, हे नक्की. भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचे झाले तर विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे चार खेळाडू महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कामगिरीवर सर्व मदार आहे. यातही बुमराह हा भारतासाठी X फॅक्टर असेल."
पण, बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांना साहाय्य करणारा एक जलदगती गोलंदाज संघात हवा होता, असे गंभीरने सांगितले. इंग्लंडच्या वातावरणाचा अभ्यास पाहता येथे जलदगती गोलंदाजांची चलती राहिलेली आहे. त्यात भारतीय संघ बुमराह, शमी व कुमार या तीनच स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाजांसह इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. ''पांड्या व शंकर हे जलदगती गोलंदाजी करू शकतील, परंतु ते पर्याय ठरू शकत नाहीत. भारतीय संघात आणखी एक स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज हवा होता. चौथा गोलंदाज हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.''