लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी दोन थरारक लढतींचा आस्वाद क्रिकेट रसिकांना लुटायला मिळाला. दुबळ्या अफगाणिस्तानने जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारताला विजयासाठी कडवी टक्कर दिली, तर दुसरीकडे वेस्ट इंडिजने पिछाडीवरून मुसंडी मारून न्यूझीलंडच्या तोंडचा घास जवळपास पळवलाच होता. पण, कार्लोस ब्रॅथवेटची झुंज अपयशी ठरली आणि न्यूझीलंडने विजयी मालिका कायम राखली. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताचा विजय पक्का केला. मात्र, अफगाणिस्तानला सलग सहावा पराभव पत्करावा लागल्याने उपांत्य फेरीच्या शर्यतीतून त्यांचे आव्हानही संपुष्टात आले. वेस्ट इंडिजही त्याच मार्गावर आहेत, परंतु अखेरच्या तीन सामन्यांत आणि अन्य संघांच्या हाराकिरीवर त्यांच्या आशा अजूनही कायम आहेत.
भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे 225 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 213 धावांत माघारी परतला. या विजयामुळे भारतीय संघाने ( 9 गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आगेकूच केली. भारताने पाच सामन्यांत चार विजय मिळवले, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले.
शनिवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. न्यूझीलंडनेही या निकालासह आपली विजयीमालिका कायम राखली आणि 11 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. वेस्ट इंडिज 3 गुणांसह सहाव्या स्थानी आहे आणि त्यांचे तीन सामने अजूनही शिल्लक आहेत.
अशी आहे गुणतालिका