लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जो रूटचे शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनेवेस्ट इंडिजवर आठ विकेट्स राखून सहज मात केली. या विजयासह इंग्लंडने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नाबाद शतकासह दोन विकेट्स मिळवणाऱ्या जो रूटला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वेस्ट इंडिजच्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. जो रूट आणि जॉनी बेअरस्टोव (45) यांनी संघाला 45 धावांची सलामी करून दिली. त्यानंतर ख्रिस वोक्सनेही 40 धावांची खेळी साकारत रुटला चांगली साथ दिली. रुटने तर नाबाद शतकी खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रुटने 94 चेंडूंत 11 चौकारांच्या जोरावर नाबाद 100 धावांची खेळी साकारली. या विजयानंतर इंग्लंडने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली, परंतु भारताची मात्र एका स्थानाने घसरण झाली.
या लढतीपूर्वी गुणतालिकेत भारतीय संघ पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. त्यामुळे भारताचे आता पाच गुण झाले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ आता पाच गुणांसह चौथ्यावरून तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्यांच्यापुढे न्यूझीलंड ( 7) आणि ऑस्ट्रेलिया ( 6) हे दोनच संघ होते. आता इंग्लंडने 6 गुणांसह उत्तम नेट रनरेटच्या जोरावर दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजच्या गेलने ३६ धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. निकोलस पुरनने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारली. यावेळी पुरनला हेटमायरची (३९) चांगली साथ मिळाली, पण ही जोडी जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकली नाही. इंग्लंडच्या मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.