ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करून वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारताच्या 352 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला. शिखर धवनचे शतक आणि त्याला विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांसह हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीनं भारतीय संघानं हा धावांचा डोंगर उभा केला. त्यांना महेंद्रसिंग धोनी व लोकेश राहुल यांची छोटेखानी साथ लाभली. ऑस्ट्रेलियाकडून संघर्ष झाला, पण त्यांना यश आले नाही. भारताच्या या विजयानंतर गुणतालिकेचे समीकरण कसे आहे, चला जाणून घेऊया..
न्यूझीलंड संघाने गुणतालिकेत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या तीनही लढती जिंकून सहा गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. इंग्लंड तीन सामन्यांत दोन विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने कांगारूंवर विजय मिळवत तिसऱ्या स्थानी झेप घेतली, तर ऑस्ट्रेलियानं अव्वल चौघांत स्थान कायम राखले. रोहित शर्मानं सातत्यपूर्ण खेळी करून दुसऱ्या सामन्यातही 57 धावा चोपल्या. या खेळीनं त्याला सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत पाचव्या स्थानी आणलं आहे. त्यानं दोन सामन्यांत 179 धावा केल्या आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन हा 260 धावांसह ( तीन सामने) अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडचे जेसन रॉय ( 215), जोस बटलर ( 185) आणि जो रूट ( 179) यांचा क्रमांक येतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकी खेळीनं शिखर धवनला ( 117) अव्वल दहामध्ये प्रवेश मिळवून दिला.
न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांनी अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे 5 व 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे एकूण आठ विकेटसह फर्ग्युसन अव्वल, तर हेन्री सात विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट घेत भारताच्या युजवेंद्र चहलने सातव्या स्थानी झेप घेतली. भुवनेश्वर कुमारनेही अव्वल दहांत जागा मिळवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्यानं तीन विकेट घेतल्या होत्या.