लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. 311 धावांचा डोंगर उभा करून त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव 207 धावांत गुंडाळला. पण, या सामन्यात क्विंटन डी'कॉक मैदानावर असेपर्यंत आफ्रिकेला विजयाच्या अपेक्षा होत्या. तो बाद झाला आणि त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. या सामन्यात क्विंटनने 68 धावांची खेळी केली. पण, 25 धावांवर असताना क्विंटन बाद झाला होता, त्याचे नशीब बलवत्तर म्हणून चेंडू यष्टिंवर आदळूनही बेल्स पडल्या नाही आणि तो नाबाद राहिला. त्यानंतर त्याने अर्धशतकी खेळी केली.
जेसन रॉय ( 54), जो रूट ( 51), इयॉन मॉर्गन ( 57) आणि बेन स्टोक्स ( 89) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी'कॉक ( 68) आणि व्हॅन डेर ड्युसन ( 50) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर ( 3/27), लिएम प्लंकेट ( 2/37) आणि बेन स्टोक्स ( 2/12) यांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे फलंदाज अपयशी ठरले. या सामन्यात स्टोक्सने अफलातून कॅचसह दोन झेल टिपले.
आफ्रिकेच्या डावाच्या 11व्या षटकात क्विंटनबरोबर हा किस्सा घडला. आदिल रशीदच्या गुगलीवर स्वीप मारण्याचा क्विंटनचा प्रयत्न फसला. चेंडू थेट यष्टिला चाटून गेला आणि लाईटही पेटली, परंतु बेल्स जागेवर कायम राहिल्याने त्याला बाद ठरवता आले नाही. हा प्रकार पाहून यष्टिरक्षक जोस बटलरसह रशीदही स्तब्ध उभे राहिले.
पाहा व्हिडीओ...