लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दुखापतग्रस्त झाल्यामुळे विजय शंकरला वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मयांक अगरवालचे नाव समोर आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विजयच्या जागी अंबाती रायुडू किंवा अजिंक्य रहाणे यापैकी एक नाव समोर येणं अपेक्षित होतं. पण मयांकचं नाव आलं.. मयांकची निवड का?
मयांकने स्थानिक क्रिकेट गाजवले आहे. शिवाय गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या मयांकने सलामीला येत दोन सामन्यांत 195 धावा केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य रहाणे व अंबाती रायुडू यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पण भारत A संघाकडून गतवर्षी मयांकने इंग्लंड दौरा गाजवला. त्यामुळे त्याचे नाव आघाडीवर आले. मयांकने त्या दौऱ्यात 71.75 च्या सरासरीनं 287 धावा चोपल्या होत्या.
"मयांकने गतवर्षी भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे पॉवरप्ले मध्ये कशी फटकेबाजी करायची आणि फिरकीचा सामना कसा करायचा हे त्याला माहित आहे. राहुल द्रविडनेही त्याचे कौतुक केले होते आणि त्याचा विचार करण्यात आला. रहाणे मधल्या फळीत अडकला आहे आणि फिरकीचा सामना करताना तो अडखळतो. रायुडूची कामगिरी निराशाजनक झालेली आहे," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
मयांकने गेल्या वर्षभरात 71 लिस्ट A क्रिकेट सामन्यांत 48.71 च्या सरासरीनं 3605 धावा केल्या आहेत. त्यात 12 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश होता.