लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर भारताचा पहिला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दोन हात करावे लागणार आहे ते दक्षिण आफ्रिकेबरोबर. आतापर्यंत या मैदानावरील सामने पाहिले तर एक गोष्ट ध्यावात येईल आणि ती गोष्ट म्हणजे भारताच्या पहिल्या लढतीत धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दी रोज बाऊल स्टेडियमची ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. 2017 सालापासून या मैदानातील 288 ही निचांक धावसंख्या आहे. गेल्या दोन वर्षात या मैदानात 3 बाद 373 ही सर्वाधिक धावसंख्या नोंदवली गेवली आहे. गेल्या महिन्यात इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ही धावसंख्या उभारली होती. पाकिस्ताने इंग्लंडच्या या आव्हानाचा पाठलाग करताना 361 धावा केल्या होत्या. या सामन्यावरून या खेळपट्टीचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे जो संघ प्रथम फलंदाजी करेल, त्यांना 350पेक्षा जास्त धावा बनवणे क्रमप्राप्त असेल.
भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. विशेषतः भारतीय गोलंदाज आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. सराव सत्रात रोहित शर्माच्या हातावर चेंडू आदळला, परंतु चिंतेचे कारण नाही.
या स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेचे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत आणि ज्यात भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेसह भारतीय संघ 22 जूनला अफगाणिस्तानचा याच मैदानावर सामना करणार आहे. 2001 साली हे स्टेडियम तयार करण्यात आले. कौंटी क्रिकेटमधील हॅम्पशायर क्लबचे हे घरचे मैदान आहे आणि त्याची क्षमता 15000 प्रेक्षकांची आहे. या मैदानावर प्रथमच वर्ल्ड कप सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारतीय संघ तीन वन डे सामना खेळला आहे आणि त्यात त्यांना एकच विजय मिळवता आलेला आहे. 11सप्टेंबर 2004 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केनियावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 आणि 2011मध्ये झालेल्या सामन्यांत त्यांना इंग्लंडकडून हार पत्करावी लागली आहे.
याच मैदानावर आफ्रिकेनेही तीन सामने खेळले आहेत आणि त्यात दोन सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी 2003 मध्ये झिम्बाव्बे आणि 2012 मध्ये इंग्लंडला येथे नमवले आहे. 2017 मध्ये त्यांना इंग्लंडकडून हार मानावी लागली.