लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर येथे भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. न्यूझीलंडने भारताला उपांत्य फेरीत पराभूत केले. त्यानंतर आता भारतीय संघात दुही निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. संघामध्ये कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये विस्तव जात नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आता भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे काही दिवसांतच संघाबाहेर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघात विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची हुकुमशाही असल्याचे बोलले जाते. त्यामुळे रोहित असो किंवा महेंद्रसिंग धोनी या अनुभवी खेळाडूंना भाव दिला जात नाही. ही गोष्ट आता सर्वांपुढे येत आहे. त्यामुळे आता शास्त्री यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा अथवा त्यांना या पदापासून दूर करावे, असे म्हटले जात आहे.
शास्त्री यांचा बीसीसीआयबरोबर विश्वचषकापर्यंत करार होता. पण आता हा करार वेस्ट इंडिजच्या दौऱ्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र शास्त्री या पदावर राहणा नाहीत, कारण बीसीसीआय नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवणार असल्याचे म्हटले जात आहे. शास्त्री हे पुन्हा संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. पण त्यांना पुन्हा संधी द्यायची की नाही, हा निर्णय बीसीसीआयची क्रिकेट सुधारणा समिती करते. या समितीमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.
टीम इंडियामध्ये उभी फूट; रोहित शर्मा संघाला सोडून मुंबईत दाखल, पाहा व्हिडीओ...भारतीय संघात फुट पडल्याचे वृत्त काही तासांपूर्वी आले होते. पण आता तर ही गोष्ट सर्वांसमोर आली आहे. भारतीय संघात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये बेबनाव असल्याचे वृत्त जागरण या वृत्तसंस्थेने प्रकाशित केले होते. पण आता तर ही गोष्ट सर्वांसमोर आली आहे. भारतीय संघाला सोडून रोहित मुंबई परतला असल्याचे वृत्त हाती आले असून याबाबतचा एक व्हिडीओदेखील वायरल होताना दिसत आहे.
हा पाहा व्हिडीओ
भारतीय संघात दुही?; विराट-रोहितमध्ये निर्णय प्रक्रियेवरुन मतभेदविश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. यामुळे क्रिकेट चाहते निराश झाले असताना टीम इंडियात गटबाजी होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक निर्णयांवरुन मतभेद असल्याचं वृत्त हिंदी दैनिक 'जागरण'नं दिलं आहे. टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसून गटबाजी सुरू असल्याचं जागरणनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एककल्ली कारभारावर आणि संघ निवडीवर काही खेळाडू नाराज होते. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्रींनी निर्णय घेतले. यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर परिणाम झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. संघात विराट आणि रोहित असे दोन गट पडले आहेत. विराटच्या गटातील खेळाडूंना सर्वाधिक संधी दिली जाते, संघ निवड करताना पक्षपात केला जातो, असा दावा करताना टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाचा दाखला देण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली. त्यासाठी अंबाती रायुडूला डावलण्यात आलं, असं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
विश्वचषक स्पर्धेदरम्यान संघाची निवड करताना मोठ्या प्रमाणात गटबाजी करण्यात आली. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्तम असल्यानं त्यांना वगळणं शक्य नव्हतं. मात्र 'विराट कंपनी'ला संधी देण्यासाठी अनेकांना डावलण्यात आलं. सातत्यानं अपयशी ठरत असूनही संघ व्यवस्थापन के. एल. राहुलच्या पाठिशी उभं राहिल्याचं 'जागरण'नं भारतीय संघातील एका खेळाडूच्या हवाल्यानं म्हटलं आहे. कुलदीप यादवऐवजी अनेकदा युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली. चहल आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो.