लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे पुढील तीन आठवडे त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, धवन वर्ल्ड कप स्पर्धेलाच मुकणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे त्याला बदली खेळाडू म्हणून रिषभ पंतचे नाव आघाडीवर आहे. धवनच्या दुखापतीनंतर पंत इंग्लंडसाठी रवाना होणार आहे, परंतु बदली खेळाडू म्हणून नाही तर राखीव खेळाडू म्हणून तो इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. धवनच्या बाबतीत बीसीसीआय कोणताही निर्णय घेण्याची घाई करू इच्छित नाही. त्यामुळे धवनला त्यांनी तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. पण, दक्षता म्हणून त्यांनी पंतला राखीव खेळाडू (स्टँड बाय) म्हणून इंग्लंडमध्ये येण्यास सांगितले आहे. संघ व्यवस्थापनाला धवनच्या तंदुरुस्त होण्याची खात्री आहे.
भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे सलामीवीर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे. या दुखापतीमुळे खचून न जाता धवननं पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, धवनला बदली खेळाडू म्हणून कपिल देव यांनी मुंबईकर अजिंक्य रहाणेचे नाव सुचवले आहे. ते म्हणाले,''धवनला बदली खेळाडू म्हणून जर रहाणेचं नाव शर्यतीत असेल, तर त्याला प्राधान्या द्यायला हवं. रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांच्याऐवजी रहाणेची निवड कधीही योग्य ठरेल. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो सलामीलाही येऊ शतको आणि मधल्या फळीतही खेळू शकतो.'' रहाणे सध्या इंग्लंडमध्येच आहे. तो कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यानं पदार्पणातच शतक झळकावले. भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधाराने 16 महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला होता.