लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 16 जूनला झाला. त्यावेळी रिषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. पण पंतला भारतीय संघात एंट्री देण्यात आली नव्हती. पण आजपासून मात्र पंत भारतीय संघात दमदार एंट्री करणार आहे.
भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. धवन तीन आठवड्यात दुखापतीतून सावरेल असे सांगण्यात येत होते, परंतु तो सावरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. IANSला बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ''धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,'' असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार होते, पण आता त्याला स्पर्धेलाच मुकावे लागणार आहे.