मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला अखेर उपांत्य फेरीतून माघारी परतावे लागले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माला महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती, परंतु तेंडुलकरचा तो विक्रम अबाधित राहिला आहे.
किवींविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने 8 सामन्यांत 92.42 च्या सरासरीने 647 धावा केल्या होत्या. त्याला एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी केवळ 27 धावांची गरज होती. मात्र, उपांत्य फेरीत रोहित एक धाव करून माघारी परतला. भारताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे रोहितची विश्वविक्रमाची संधी हुकली. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत 2003 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यांत 61.18 च्या सरासरीने 673 धावा केल्या होत्या. तेव्हापासून एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर कायम आहे. तेंडुलकरने त्यावेळी आपल्या पूर्वीच्या विक्रमात सुधारणा केली होती. त्याने 1996 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत सात सामन्यांत 523 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन वेस्ट इंडिजमध्ये 2007 ला झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनचा विक्रम मोडण्याच्या समीप पोहचला होता, पण अखेर त्याला 659 धावांवर समाधान मानावे लागले होते. रोहितने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच शतके झळकावली असून हाही एक विक्रम आहे. रोहित आता वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतक नोंदवण्याचा सचिनचा विक्रम मोडण्याच्या स्थितीत होता. पण, त्याला 9 सामन्यात 648 धावांवर समाधान मानावे लागले.