लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननं 71 चेंडूंत 148 धावांची खेळी केली. त्यात चार चौकार व 17 षटकार खेचून विक्रम नावावर केला. इंग्लंडच्या 397 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला 8 बाद 247 धावा करता आल्या. या विजयानंतर इंग्लंडने गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अव्वल चार क्रमवारी बदलता संघ तेच आहेत.. ऑस्ट्रेलिया ( 8), न्यूझीलंड ( 7) आणि भारत (7) हे अव्वल चौघांत आहे. पण, या चार संघांतील एकही फलंदाज किंवा गोलंदाज अव्वल स्थानी नाही.
फलंदाजांत बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन चार सामन्यांत 384 धावांसह टॉपवर आहे. फलंदाजांमध्ये भारताचा रोहित शर्मा ( 319 धावा) चौथ्या स्थानी आहे. त्याच्याव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज टॉप टेनमध्ये नाही. कर्णधार विराट कोहली ( 177) चौदाव्या स्थानावर आहे.
पाकिस्तान संघाची वर्ल्ड कपमधील कामगिरी साजेशी झाली नसली तरी त्यांचा गोलंदाज मोहम्मद आमीरनं आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्यानं 4 सामन्यांत 13 विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कच्या नावावरही 13 विकेट्स आहेत, परंतु त्यानं 5 सामने खेळले आहेत. भारताचा एकही गोलंदाज टॉप टेन मध्ये नाही. युजवेंद्र चहल 15व्या क्रमांकावर आहे.