भारताच्या 'मिशन वर्ल्ड कप २०१९' चा 'शुभ आरंभ' झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्सनी नमवून टीम इंडियानं विजयी सलामी दिली. या विजयाचा पाया बुमराह-चहल जोडीनं रचला होता आणि रोहित शर्माच्या शतकानं त्यावर कळस चढवला. वनडे करिअरमधील २३ वं शतक झळकावत रोहितनं 'दादा' सौरव गांगुलीला मागे टाकलंच, पण वर्ल्ड कपच्या रेकॉर्ड बुकमध्येही भारताचं नाव अव्वल स्थानी नेऊन ठेवलं.
टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या (४९ शतकं) नावावर आहे. दुसरा नंबर लागतो, विराट कोहलीचा. 'रन मशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटनं ४१ शतकं ठोकली आहेत. या यादीत २३ शतकांसह रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. त्याखालोखाल सौरव गांगुली (२२ शतकं), शिखर धवन (१६ शतकं) आणि वीरेंद्र सेहवाग (१५ शतकं) हे तिघं आहेत.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया संघ २६ शतकांसह अव्वल स्थानी होता. परंतु, रोहितच्या शतकामुळे भारताच्या नावावरही आता २६ शतकं जमा झाली आहेत आणि टीम इंडियानं पहिला नंबर पटकावला आहे.
* या यादीतील अन्य संघः > श्रीलंका - २३> वेस्ट इंडीज - १७> न्यूझीलंड - १५> दक्षिण आफ्रिका - १४> पाकिस्तान - १४> इंग्लंड - १३
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांमध्येही रोहित शर्मा (११ षटकार) अव्वल स्थानी आहे. धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेत १०, शिखरनं ९ आणि विराट कोहलीनं ३ षटकार मारले आहेत.
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार केला असून सलामीला खेळताना ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकं झळकावणारे क्रिकेटवीर> विराट कोहली - २५ >सचिन तेंडुलकर - १७> ख्रिस गेल - १२> तिलकरत्ने दिलशान - ११ > रोहित शर्मा - ११
दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी २२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना मोठ्या खेळी साकारता आल्या नाही. पण रोहितनं शांत डोक्यानं एका बाजूने किल्ला लढवला आणि भारताचा विजय सुकर केला. त्यानं १३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद १२२ धावांची खणखणीत खेळी साकारली. महेंद्रसिंग धोनीनंही ३४ धावा करत त्याला चांगली साथ दिली.