लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील पंचांची वाईट कामगिरी अंतिम फेरीतहीकायम राहिल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा मोठा फटका न्यूझीलंडच्या संघाला बसू शकतो. कारण पंच माराएस इरॅसमस यांनी न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलरला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे आता पुढे आले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन बाद झाल्यावर संघाची मदार टेलरवर होती. टेलरने धावांची गती कायम राखत धावपलक हलता ठेवला होता. टेलर स्थिरस्थावर झालेला दिसत होता. टेलर आता मोठे फटके मारणार असे वाटत होते, पण त्याचवेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्याचा घात केला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने ३३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टेलरला पायचीत पकडले. यावेळी त्यांनी पंचांकडे जोरदार अपील केले. त्यावेळी पंच इरॅसमस यांनी टेलरला बाद ठरवले. न्यूझीलंडकडे रीव्ह्रू नसल्याने टेलरला या निर्णयाविरोधात दाद मागता आली नाही. त्यामुळे मान खाली घालून टेलर माघारी परतला.
टेलर माघारी परतल्यानंतर हा चेंडू पुन्हा दाखवण्यात आला. त्यावेळी वूडचा चेंडू स्टम्पला लागत नसल्याचे स्पष्टपण दिसत होते. हा चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्यामुळे तो पायचीत बाद देणे, चुकीचे असल्याचे साऱ्यांनी पाहिले. अंतिम फेरीत जर पंचांकडून अशा चुका होत असतील तर खेळाडूंनी पाहायचे कुणाकडे, हा प्रश्न आता चाहते विचारू लागले आहेत.