लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटचा महाकुंभमेळा आजपासून सुरू होत आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंड व आफ्रिकेसाठी खास असला तरी भारतीयांसाठी हा सामना विशेष भेट घेऊन येणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर या सामन्यात प्रथमच समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तेंडुलकर समालोचक म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेतून पदार्पण करणार आहे.
`Sachin Opens Again` या Star Sports networkच्या विशेष कार्यक्रमात तेंडुलकर फिलिप्स ह्यू सोबत क्रिकेटवर चर्चेत सहभाग घेणार आहे. त्यामुळे त्याच्या पदार्पणाची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सर्वाधिक सहा वर्ल्ड कप खेळण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर असून त्याने 2278 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही तेंडुलकरने केला आहे. त्याने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्या 673 धावा केल्या होत्या.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळले. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पण, दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी साकारली. राहुलच्या शतकाने भारताच्या चौथ्या क्रमांकाचा तिढा सोडवला आहे. भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहे, परंतु मुख्य स्पर्धेपूर्वी देण्यात आलेल्या 60 सेकंद चॅलेंजमध्ये भारताच्या चमूला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यजमान इंग्लंडने अव्वल,तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान पटकावले. काय होतं हे 60 सेकंद चॅलेंज? आणि कोणी कशी मारली बाजी? पाहा व्हिडीओ..