मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनला रवाना झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी आतुर आहे. 2011साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अखेरचा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे यंदा कोहली हा वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपवेल, असा सर्वांना ठाम विश्वास आहे. कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा लागलेल्या आहेत आणि संघही त्याच्यावर विसंबून आहे. पण, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. एकट्या कोहलीवर अधिक विसंबून राहू नका असा सल्ला भारताच्या इतर खेळाडूंना त्याने दिला आहे. कोहली अपेक्षांवर खरा उतरला नाही, तर भारताची वर्ल्ड कपमधील कामगिरी निराशाजनक होईल असेही तो म्हणाला.
''प्रत्येक सामन्यात संघातील खेळाडूंनी जबाबदारीनं खेळ करत पुढाकार घ्यायला हवा, परंतु संघाच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. एका खेळाडूच्या जोरावर तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. त्याला अन्य खेळाडूंचीही साथ मिळणे तितकेच गरजेचे असते. तसे न झाल्यास हाती नैराश्य लागते,'' असे तेंडुलकर म्हणाला.
चौथ्या क्रमांकाबाबत विचारले असता तेंडुलकर म्हणाला,''आपल्याकडे असे फलंदाज आहेत की ते त्यांची जबाबदारी योग्यरितीने पार पाडतील. चौथ्या क्रमांकाची समस्या मला तरी सध्या दिसत नाही, तो केवळ आकडा आहे. संघातील प्रत्येक खेळाडूकडे पुरेसा अनुभव आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. परिस्थितीनुसार निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.'' भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.