मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत कोणते संघ प्रवेश करतील, याचा अंदाज भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. वर्ल्ड कप स्पर्धेचा हा 12वा हंगाम आव्हानात्मक असेल असे तेंडुलकरने व्यक्त केले. उपांत्य फेरीत भारतासह यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ नक्की प्रवेश करतील, परंतु चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात शर्यत असेल, असा अंदाज तेंडुलकरने व्यक्त केला आहे.
ESPNCricinfoला दिलेल्या मुलाखतीत तेंडुलकरने हा अंदाज व्यक्त केला. भारत आणि इंग्लंड या दोन संघांची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता अधिक आहे. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर या दोन्ही संघांनी वन डे क्रिकेटमधील कामगिरी ही उंचावलेली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला दोन वर्षांत केवळ दोनच मालिका गमवाव्या लागल्या. दुसरीकडे इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने सलग 11 वन डे मालिका जिंकल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीनं कुठल्या क्रमांकावर खेळावं? सचिन तेंडुलकरनं दिलं उत्तर
भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यात भारतीय संघ अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ जाहीर झाल्यापासून किंवा तत्पूर्वी पासून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची चर्चा सुरू होती. अनेकांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या क्रमांकावर खेळवावे असा प्रस्ताव मांडला, परंतु माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने धोनीनं कोणत्या क्रमांकावर खेळावे हा सल्ला दिला आहे.
धोनीबाबत तेंडुलकर म्हणाला,''मला विचाराल तर धोनीनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. फलंदाजीची क्रमवारी कशी असेल याबाबत मला माहीत नाही. रोहित आणि शिखर धवन सलामीला येणार असतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल हे माहीत नाही, परंतु धोनी पाचव्या क्रमांकावर येईल. त्यानंतर हार्दिक पांड्या असेल. धोनीसारखा अनुभवी फलंदाज अखेरपर्यंत संघाचा धावफलक हलता ठेवेल आणि तो खेळपट्टीवर असताना पांड्या आक्रमक खेळी खेळेल.''