लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील थरार अनुभवण्याची संधी दिली. दोन्ही संघांना चढ-उतारांचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दोन्ही सलामीवीर पहिल्याच षटकात गमावल्यानंतर कमबॅक करताना 291 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात विंडीजचीही अवस्था बिकटच झाली होती, पण, कार्लोस ब्रॅथवेटनं अखेरपर्यंत विंडीजच्या विजयासाठी संघर्ष केला. दुर्दैवानं त्याला अपयश आले आणि न्यूझीलंडने अवघ्या 5 धावांनी हा सामना जिंकला. ब्रॅथवेटच्या या खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकरने त्याच्या खेळीबाबत एक प्रश्न विचारला आहे आणि त्यावर उत्तरही मागितले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील आव्हान टीकवण्याच्या दृष्टीनं विंडीजसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. न्यूझीलंडला पहिल्याच षटकात दोन धक्के देत त्यांनी त्या दिशेनं पाऊलही टाकलं, परंतु केन विलियम्सन आणि रॉस टेलर ही अनुभवी जोडी मैदानावर चिकटली आणि 160 धावांची भागीदारी करून किवींना पुन्हा ट्रॅकवर आणले. विलियम्सनच्या 148 आणि टेलरच्या 69 धावांच्या जोरावर किवींनी 8 बाद 291 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचे 2 फलंदाज 20 धावांवर माघारी परतले. ख्रिस गेल ( 87) आणि शिमरोन हेटमायर ( 54) यांनी योगदान दिले, परंतु किवींनी धक्का सत्र सुरू केले. विंडीजचे 7 फलंदाज 164 धावांत माघारी परतले होते अन् किवींचा विजय जवळपास निश्चितच झाला होता.
पण, अखेरच्या 13 षटकातं तळाच्या तीन फलंदाजांना ( मुळचे गोलंदाज) सोबत घेऊन विजयासाठीच्या 127 धावांचा पाठलाग करण्यासाठी ब्रॅथवेटने खेळपट्टीवर शड्डू ठोकला... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असलेला न्यूझीलंड संघ त्याच्या फटकेबाजीसमोर हतबल झाला होता. पाहतापाहता ब्रॅथवेटनं चेंडू व धावांच अंतर कमी केलं. केमार रोच, शेल्डन कोट्रेल आणि ओशाने थॉमस या गोलंदाजांसह ब्रॅथवेटनं विंडीजच्या विजयासाठी खिंड लढवली. थॉमससोबतच्या 41 धावांच्या भागीदारीत ब्रॅथवेटनेच सर्व धावा केल्या आणि त्याही केवळ 20 चेंडूंत. अखेरच्या 12 चेंडूंत 8 धावा असा विंडीजच्या बाजूनं झुकवला. ब्रॅथवेटनं 49व्या षटकाचा अखेरच्या चेंडूवर जोरदार प्रहार केला अन् चेंडू सीमारेषेपार जाईल असेच वाटत होते. पण, घडले विपरित ट्रेंट बोल्टनं सीमारेषेनजीक अगदी अचुकतेन झेल टिपला. ब्रॅथवेटनं 82 चेंडूंत 9 चौकार व 5 षटकार खेचून 101 धावा केल्या.
त्याच्या या खेळीवर मांजरेकर म्हणाला,''ब्रॅथवेटनं शतक झळकावलं, परंतु त्यानं 6 षटकातं जवळपास 10च्या सरासरीनं धावाही दिल्या. अन्य गोलंदाजांच्या तुलनेत प्रती षटक चार धावा अधिक. त्यामुळे एक खेळाडू म्हणून ब्रॅथवेटचं कोणतं योगदान ग्राह्य धराल? तुमच्या प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे.''