ICC World Cup 2019 : कसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण...

ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना उपांत्य फेरीच्या दिशेनं आगेकूच केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:40 PM2019-06-28T12:40:48+5:302019-06-28T12:43:59+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Semi Final qualification scenarios: India a win away from semifinal spot | ICC World Cup 2019 : कसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण...

ICC World Cup 2019 : कसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना उपांत्य फेरीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. गुरूवारी भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवून 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.  याचवेळी वेस्ट इंडिज हा उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद होणार अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेनंतर तिसरा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रथम मान पटकावला, तर उर्वरित तीन जागांसाठी सहा संघांत शर्यत आहे.
पाकिस्तान संघानेही जोरदार मुसंडी मारून उपांत्य फेरीच्या दिशेनं आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. 34 सामन्यानंतर गुणतालिकेचे चित्र असे आहे. 

भारत - भारतीय संघाने सहा सामन्यांत पाच विजय व एक अनिर्णीत निकालासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी त्यांना केवळ एक विजय आवश्यक आहे. शिवाय उर्वरित तीन सामने जिंकून त्यांना अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे.


न्यूझीलंड - केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला सात सामन्यांत एक पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानविरुद्धच्या या पराभवानं त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांनाही उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी एक विजय पुरेसा आहे, परंतु त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे दोन तगडे संघ आहेत. पण या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यास त्यांना इंग्लंड, श्रीलंका यांच्या पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल. शिवाय पाकिस्तान व बांगलादेश यांच्या उर्वरित सामन्यांतील एक पराभव किवींच्या फायद्याचा ठरणार आहे. असे न घडल्यास त्यांना भारताने तीनही सामने गमवावे अशी प्रार्थना करावी लागेल.  


इंग्लंड - पहिल्या पाच सामन्यांत आघाडीवर असलेल्या इंग्लंडला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धचा पराभव चांगलाच महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंडला उर्वरित दोन सामन्यांत भारत व न्यूझीलंड यांचा सामना करावा लागेल आणि त्यांना दोन्ही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. जर त्यांनी एकच सामना जिंकला, तर त्यांना श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा एका सामन्यात पराभव व्हावा अशी प्रतीक्षा करावी लागेल. अशा परिस्थितील श्रीलंका 10 गुणांसह आघाडीवर असेल, परंतु इंग्लंडच्या खात्यात 11 गुण असतील, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी 9 गुण राहतील. पण, दोन्ही सामन्यांत पराभव झाल्यास नेट रनरेट आणि अन्य संघांच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून राहिल.


बांगलादेश - मश्रफे मोर्ताझाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांना पराभूत करून घरचा रस्ता दाखवला. उर्वरित लढतीत पाकिस्तान व भारताला पराभूत केल्यास त्यांच्या खात्यात 11 गुण होतील, पण त्यांच्या उपांत्य फेरीच्या मार्गात काही अडथळे असतील.
- इंग्लंड व श्रीलंका यांचा एका सामन्यात पराभवाची प्रतीक्षा
- न्यूझीलंडला ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यास नेट रन रेटच्या जोरावर बांगलादेश आघाडी घेऊ शकतो. शिवाय भारतानेही तीनही सामने पराभूत होणे त्यांच्या फायद्याचे आहे.
- बांगलादेशला 9 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवायचा असल्यास त्यांना इंग्लंड व श्रीलंका यांनी दोन्ही लढती गमवाव्या यासाठी प्रार्थना करावी लागेल. शिवाय पाकिस्तानचा एक पराभवही त्यांच्या फायद्याचा ठरेल.  


पाकिस्तान - इंग्लंडच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या सर्वाधिक आशा उंचावल्या आहेत. त्यांना उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवल्यास 11 गुणांसह ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतील, पण त्यालाही जर तरची साथ आवश्यक आहे.
- इंग्लंड आणि श्रीलंका यांचा एक पराभव
- न्यूझीलंडने दोन्ही, तर भारताने तीनही सामने गमावणे पाकच्या फायद्याचे
- 9 गुणांसह अंतिम चौघात स्थान मिळवण्यासाठी इंग्लंड व श्रीलंका यांच्या दोन्ही सामन्यांत पराभवाची प्रार्थना


श्रीलंका - यजमान इंग्लंडवरील विजय हा सर्वांसाठी अनपेक्षित होता आणि त्याच विजयाने उपांत्य फेरीची चुरस वाढवली आहे. श्रीलंकेला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील, परंतु त्याचवेळी इंग्लंडच्या एका पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.  तीनपैकी दोन सामने जिंकल्यास लंकेच्या खात्यात 10 गुण होतील आणि त्यांना इंग्लंडच्या दोन्ही सामन्यात पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल. शिवाय बांगलादेश व पाकिस्तान यांचा एका सामन्यात पराभव व्हावा हेही पाहावं लागेल.  

Web Title: ICC World Cup 2019 : Semi Final qualification scenarios: India a win away from semifinal spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.