टाँन्टन - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजून एका धक्कादायक निकालाची नोंद केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या ३२२ धावांच्या आव्हानाचा सात विकेट्स राखून फडशा पाडत बांगलादेशने विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवले. शकीब अल हसनने केलेली शानदार शतकी खेळी आणि त्याला लिटन दास व तमीम इक्बाल यांनी त्याला दिलेली सुरेख साथ बांगलादेशच्या विजयात निर्णायक ठरली. वेस्ट इंडिजने दिलेल्या ३२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमीम इक्बाल आणि सौम्या सरकार यांनी बांगलादेशला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र सौम्या सरकार २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या शकीब अल हसनने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने तमीमच्या साथीने ६९ धावांची भागीदारी करत संघाला शंभरीपार नेले. मात्र तमीम इक्बाल (४८) आणि मुशफिकर रहिम (१) हे झटपट बाद झाल्याने बांगलादेशचा डाव अडचणीत आला. मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या युवा लिटन दासने शकीब अल हसनला सुरेख साथ दिली. यादरम्यान शकीबने आपले शतक पूर्ण केले. यंदाच्या विश्वचषकातील शकीबचे हे दुसरे शतक ठरले. तर लिटन दासनेही जोरदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. शकीब आणि लिटन दास यांनी चौथ्या विकेटसाठी अभेद्य १८९ धावांची भागीदारी करत बांगलादेशला ४२ व्या षटकातच सात विकेट राखून विजय मिळवून दिला. शकिब अल हसन १२४ आणि लिटन दास ९४ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली. स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल शुन्यावर माघारी परतला. मात्र शाय होप (९६), इव्हीन लुईस (७०), शिमरॉन हेटमायर (५०) आणि जेसन होल्डर (३३) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ५० षटकांमध्ये ८ बाद ३२१ धावा फटकावल्या. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफिझूर रहमान यांनी प्रत्येकी तीन तर शकीब अल हसनने दोन विकेट टिपल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : शकीब-लिटनचा झंझावात, बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला शॉक
ICC World Cup 2019 : शकीब-लिटनचा झंझावात, बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला शॉक
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजून एका धक्कादायक निकालाची नोंद केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 10:50 PM