लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल रविवारी पाहायला मिळाला. बांगलादेश संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. ही एक लढत वगळल्यास आतापर्यंत झालेले सामने एकतर्फी झाले. वर्ल्ड कपच्या या क्रिकेटमय वातावरणात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने ड्रीम इलेव्हन संघ निवडला आहे. वॉर्नच्या या संघात सचिन तेंडुलकर या एकमेव भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे, तर पाकिस्तानच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
वॉर्नच्या या संघात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचाही समावेश आहे. तेंडुलकर आणि अॅडम गिलख्रिस्ट यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे, तर तिसऱ्या क्रमांकासाठी पाँटिंगचे नाव आहे. त्यानंतर ब्रायन लारा, मार्क वॉ आणि कुमार संगकारा हे फलंदाजीला येतील. गोलंदाजीची जबाबदारी वॉर्नने अँड्य्रू फ्लिंटॉफ, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शाहिद आफ्रिदी व मुरलीधरन यांच्यावर असणार आहे.