मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शिखर धवनच्या माघारीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वर्ल्ड कप स्पर्धा निम्म्यावर सोडावी लागणार आहे. धवन दुखापतीतून सावरेल असे सर्वांना वाटत होते, परंतु तसे झाले नाही. तो जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत तंदुरूस्त होणार नसल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले. त्यामुळे त्याला वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं रोहित शर्मासह सलामीची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही राहुल व रोहितनं दमदार सलामी करून दिली. पण, धवनचं नसणं भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला फार धोकादायक ठरणारे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये धवनचं नाणं नेहमी खणखणीत वाजलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याच्याकडून फार अपेक्षा होती. त्याने 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक 90.75च्या सरासरीनं 363 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2014च्या आशिया चषक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्याच नावावर होता. धवनने 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 8 सामन्यांत 412 धावा चोपल्या होत्या. 2017च्या चॅम्पियन्स आणि 2018च्या आशिया चषक स्पर्धेतही त्याने अनुक्रमे 338 आणि 342 धावा कुटल्या होत्या. महत्त्वांच्या स्पर्धांमध्ये धवनने नेहमी दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याची माघार ही भारतासाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल.
दुखापतीतून सावरून तो 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास व्यक्त केला जात होता.''त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळे,'' असे सांगण्यात आले होते. पण, बीसीसीआयनं धवन फिट होणार नसल्याचे सांगितले.
रिषभ पंत करणार भारतीय संघात एंट्रीभारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 16 जूनला झाला. त्यावेळी रिषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. पण पंतला भारतीय संघात एंट्री देण्यात आली नव्हती. पण आजपासून मात्र पंत भारतीय संघात दमदार एंट्री करणार आहे.