ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवडे क्रिकेटपासून दूरावलेला शिखर धवन वर्ल्ड कप स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी सज्ज होत आहे. पॅट कमिन्सने टाकलेल्या चेंडूवर भारताच्या सलामीवीराच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तरीही त्यानं जिद्दीनं खेळ करत 117 धावा चोपून काढल्या होत्या. मात्र, दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणाला आला नाही. तो दुखापतीतून सावरत असून 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास आहे.
नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर तो संघांसोबत सराव सत्रातही दिसला होता. भारत-न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समाना एक गुण देण्यात आले. या सामन्यानंतर कॅप्टन विराट कोहलीनं धवनच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली.''त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल.''
ESPNcricinfoच्या हाती लागलेल्या माहितीनुसार साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात धवन पुनरागमन करेल. त्यामुळे तो यजमान इंग्लंडविरुद्ध 30 जूनला एडबॅस्टन येथे होणाऱ्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश ( 2 जुलै) आणि श्रीलंका ( 6 जुलै) या संघांचा सामना करेल. पण, धवनला पाकिस्तान ( 16 जून), अफगाणिस्तान ( 22 जून) आणि वेस्ट इंडिज ( 27 जून) या लढतींना मुकावे लागणार आहे. धवनला स्टॅण्ड बाय खेळाडू म्हणून रिषभ पंतला इंग्लंडला बोलावण्यात आले आहे.
भारताचे साहाय्यक प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार धवन हा सराव करत आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. पण हे मोठे फ्रॅक्चर नसल्याचे आता समोर येत आहे. कारण जर फ्रॅक्चर गंभीर असले असते तर धवनला सराव करायलाच दिला नसता. त्यामुळे धवनची गाडी हळूहळू रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ते म्हणाले की, " वजनाने हलक्या असलेल्या चेंडूने आम्ही धवनकडून प्रथम सराव करून घेतला. त्यानंतर क्रिकेटच्या चेंडूने आम्ही धवनला सराव करायला सांगितले. हे आव्हानात्मक आहे."