'कॅप्टन कोहली'च्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आजच आपलं 'मिशन वर्ल्ड कप' सुरू केलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटसेनेचा मुकाबला होतोय. गेल्या काही वर्षांत विराटच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी बहरलीय. त्यामुळे जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये भारताचं नाव घेतलं जातंय. कोहलीकडून चाहत्यांना विराट विक्रमाची अपेक्षा आहे. असं असतानाच, पाकिस्तानचा माजी तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरनं भारताच्या भावी कर्णधाराबद्दल भाकित वर्तवलं आहे.
विराट कोहलीनंतर संघाचा कर्णधार कोण होईल, याची वास्तविक अजिबातच चर्चा नाही. ती असायचं कारणही नाही. पण, तसा विचार करायचा झाल्यास, सगळ्यात पहिलं नाव डोक्यात येतं, ते रोहित शर्माचं. तो आत्ताही संघाचा उपकर्णधार आहे. त्याच्या खालोखाल नंबर लागतो शिखर धवनचा. परंतु, शोएब अख्तरच्या म्हणण्याप्रमाणे, के एल राहुल हा भारताचा भावी कर्णधार असेल.
'आत्ताचा भारतीय संघ हा सगळ्यात खतरनाक आहे. त्यांच्याकडे अनेक मॅच विनर्स आहेत. रोहित शर्मा-शिखर धवनसारखे सलामीवीर, त्यानंतर विराटसारखा जगातील सर्वोत्तम फलंदाज ही टीम इंडियाची ताकद आहे. पण के एल राहुल हा माझा फेव्हरिट आहे. तो भविष्यात विराट कोहलीच्या पावलावर पाऊल टाकत यशस्वी फलंदाज होऊ शकतो', असं मत शोएब अख्तरनं व्यक्त केलंय.
संघातून वगळल्यास सगळा राग सरावादरम्यान काढ, त्वेषाने खेळ, असं मी लोकेश राहुलला सुचवलं होतं. त्याने अगदी तसंच केलं. क्रिकेटवरचं लक्ष त्यानं विचलित होऊ दिलं नाही. विराटनंतर टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्यात असल्याचंही मी त्याला सांगितलंय, असं शोएब म्हणाला.