लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला सोमवारी बेभरवशी पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला. 348 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 334 धावाच करता आल्या. जो रूट आणि जॉस बटलर यांची शतकी खेळी नंतरही इंग्लंडला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तानचा हा विजय म्हणजे सर्जिकल स्ट्राईक असल्याचे सांगितले.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला 348 धावांचा पल्ला गाठून दिला. मोहम्मद हफिज ( 84), बाबर आजम ( 63), सर्फराज अहमद ( 55), इमाम उल हक ( 44) आणि फखर जमान ( 36) यांनी दमदार खेळ केला. त्याच्या प्रत्युत्तरात जो रूट व जॉस बटलर यांनी शतकी खेळी केल्या. कर्णधार इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि जेसन रॉय यांना अपयश आले. रूट व बटलर यांच्या शतकानंतरही इंग्लंडला 9 बाद 334 धावांपर्यंतच मजल मारता आली.
शोएब म्हणाला,''आजचा हा विजय अनपेक्षित नव्हता. आमचा कर्णधार आता जागृत होत आहे. पाकिस्तानने संपूर्ण ताकदीनं हा सामना जिंकला. सामन्यापूर्वीच मी सांगितले होते की, इंग्लंडविरुद्ध खेळाडू स्ट्राईक करतील आणि आज तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला.''
पाहा व्हिडीओ...