लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली, त्यानंतर संघावर आणि कर्णधार सर्फराज अहमदवर चहुबाजूंनी टीका झाली. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही सर्फराजची चांगली कानउघाडणी केली. पण, त्यानंतर त्याने पाकिस्तान संघ पुनरागमन करेल, असा विश्वासही व्यक्त केला. पाकिस्तान संघाला त्यानं एक सल्ला दिला आणि त्यावरुन इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसनने रावळपिंडी एक्स्प्रेसला चांगलेच ट्रोल केले.अख्तरने सल्ला देताना पीटरसनला बाद केल्यानंतर केलेल्या जल्लोषाचा फोटो शेअर केला. त्यावरून पीटरसनने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानला पहिल्याच सामन्या विंडीजने 7 विकेट राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी पाठवून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. फाखर जमान व बाबर आजम यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओशाने थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही तीन विकेट घेतल्या. विंडीजने 105 धावांचे माफक लक्ष्य 13.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलने 34 चेंडूंत 50 धावा चोपल्या. निकोलस पूरणने 19 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली.
या कामगिरीनंतर अख्तरने ट्विट केले. त्याने लिहिले की,'' आक्रमकता, जिंकण्याची जिद्द आणि त्यासाठी सर्वतोपरी करण्याची तयारी, बदमाशी या सर्वांची आवश्यकता आहे. तुमच्या जर्सीवरील स्टारचा अभिमान बाळगा. तगडा खेलो. लढ जाओ...''