लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने सलग दोन विजयांसह वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान सध्या तरी कायम राखलं असलं तरी त्यांच्यासाठी मंजील अभी दूरच आहे, असं म्हणावं लागेल. संघाच्या कामगिरीसह त्यांना अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे. विशेषतः भारत आणि इंग्लंड या लढतीवर त्यांचे भवित्यव अबलंबून आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे एरवी भारतीय संघावर टीका करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी खेळाडू शोएब अख्तरला अचानक शेजारधर्म आठवला आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून उपांत्य फेरीच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांत त्यांना एक विजय पुरेसा आहे. भारताला उर्वरित लढतीत यजमान इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा सामना करावा लागणार आहे. येत्या रविवारी त्यांचा सामना इंग्लंडशी आहे आणि इंग्लंडसाठी हा सामना करो वा मरो असाच आहे. त्यामुळे या लढतीत इंग्लंड विजयासाठी स्वतःला झोकून देतील, हे निश्चित आहे.
सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे तीन सामने शिल्लक आहेत आणि ते 11 गुणांसह दुसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. पण, त्यांना इंग्लंडच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. इंग्लंडचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे आणि त्यात भारताने विजय मिळवल्यास पाकिस्तानच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होऊ शकतो.
या लढतीपूर्वी शोएब अख्तरने एक व्हिडीओ अपलोड केला. तो म्हणाला,''पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यासाठी भारतीय संघ मदत करेल. भारतीय संघाने इंग्लंडला नमवल्यास पाकिस्तानचा मार्ग सोपा होईल.'' यावेळी अख्तने पाकिस्तानच्या बाबर आजमचेही कौतुक केले आणि त्याला सातत्य राखण्याचा सल्ला दिला.