लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू आणि भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकची कारकिर्द धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. कारण आज लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मलिकला संधी देण्यात आलेली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मलिक आणि सानिया एका हुक्का पार्लरमध्ये पाहिले गेले होते. त्यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली असल्याचे काही चाहते म्हणत आहेत.
विश्वचषकात मलिकला तीन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये मलिकला भोपळाही फोडता आलेला नव्हता, तर एका सामन्यात त्याला फक्त आठ धावाच करता आल्या होत्या. मलिकला भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आपले खातेही उघडता आले नव्हते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मलिकने आठ धावा केल्या होत्या, त्याचबरोबर गोलंदाजी करताना एक बळीही मिळवला होता. भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मात्र मलिकला एकही बळी मिळवता आला नव्हता.
भारताविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर मलिक चांगलाच ट्रोल झाला होता. त्यामुळे आता त्याच्यावर पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन जास्त विश्वास दाखवत नसल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत ३८ वर्षीय मलिकने पाकिस्तानसाठी २८७ एकदिवसीय सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये 34.55च्या सरासरीने त्याने 7534 धावा बनवल्या आहेत, त्याचबरोबर १३५ बळीही मिळवले आहेत.
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू चांगलेच ट्रोल झाले होते. कारण भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमधील हुक्का पार्लरमध्ये दंगा करत होते, असे म्हटले जात होते. भारताची टेनिस सम्राज्ञी आणि तिचा पती व पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक एका हुक्का पार्लरमध्ये दिसले होते. या दोघांसह पाकिस्तानचे काही महत्वाचे खेळाडूही यावेळी हुक्का पार्लरमध्ये असल्याचे म्हटले गेले होते.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ हुक्का पार्लरमध्ये गेल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला, असे सोशल मीडियावर म्हटले गेले. पण एवढे पुरावे दिल्यानंतर पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ खेळाडूंची बाजू लावून का धरत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
यावेळी चाहत्यांनी या दोघांना चांगलेच धारेवर धरले होते. पण भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू हुक्का पार्लरमध्ये नाही तर हॉटेलमध्ये होते, असे स्पष्टीकरण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दिले आहे.