लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसानं वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत पावसामुळे मागील पाच दिवसांत चार सामने रद्द करावे लागले आहेत. गुरुवारी भारतीय संघालाही याचा फटका बसला. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजवर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समान एका गुणावर समाधान मानावे लागले. पावसाच्या या फटकेबाजीपासून वाचण्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आयसीसीला एक सल्ला दिला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यावर अल्प कालावधीत सामना कसा खेळवता येईल, याचा उपाय सुचवला आहे.
गांगुली सध्या इंग्लंडमध्येच आहे, परंतु समालोचकाच्या भूमिकेत. पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरू करण्यासाठी भारतात वापरण्यात येणाऱ्या पद्धतीचा येथे अवलंब करावा असा सल्ला गांगुलीनं दिला आहे. तो म्हणाला,'' भारतील इडन गार्डन स्टेडियमवर जे कव्हर्स वापरले जातात, ते इंग्लंडमधूनच मागवण्यात आले आहेत. त्यामुळे इथल्याच कव्हर्सचा वापर वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान केला, तर खर्च निम्मा होईल, शिवाय करही वाचेल. भारतात सर्व सामन्यांसाठी याच कव्हर्सचा वापर केला जातो. त्यामुळे पाऊस थांबताच दहा मिनिटांत सामना सुरु केला जातो. हे कव्हर्स हलके असतात आणि त्यासाठी अधिकचा मनुष्यबळही खर्ची लागत नाही.''
सामना रद्द झाला, पण भारताला मिळाली 'ही' गोड बातमी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अखेर पावसानेच बाजी मारली. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे अखेर सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पण सामना रद्द झाला असला तरी भारतासाठी एक गोड बातमी मिळाली आहे. ही बातमी नेमकी कोणती ते जाणून घ्या... या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर होता. कारण न्यूझीलंडने यापूर्वी श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सहा गुणांसह न्यूझीलंड अव्वल स्थानावर होता. हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले असते. पण त्यांनी जर मोठ्या फरकाने सामना गमावला असता तर त्यांचे अव्वल स्थान धोक्यात आले असते.
भारताने आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन सामन्यांतील विजयासह भारतीय संघ चौथ्या स्थानावर होता. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. त्यामुळे भारताचे आता पाच गुण झाले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ आता पाच गुणांसह चौथ्यावरून तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. आता भारतापुढे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोनच संघ असतील.
Web Title: ICC World Cup 2019 : Sourav Ganguly suggests solution after India vs New Zealand World Cup match gets washed out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.