लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दक्षिण आफ्रिकेने दिलेले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांनी हातभार लावत बांगलादेशला 6 बाद 330 धावांचा पल्ला गाठून दिला. वन डे क्रिकेटमधील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. पण, त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेसमोर तगडं आव्हान त्यांनी उभं केलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांचा पाठलाग करतानाचा इतिहास पाहता आफ्रिकेला हे आव्हान पेलणे तितकं सोपं नक्की नसेल. कारण...
इक्बाल व सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. इम्रान ताहीरने ही जोडी तोडली. त्याने शकिबला 75 धावांवर बाद केले. त्यानंतर मोहम्मद मिथून ( 21) माघारी परतला. मुशफिकर एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याची ही घोडदौड फेहलुक्वायोनं रोखली. 43व्या षटकात फेहलुक्वायोनं 78 धावा करणाऱ्या मुशफिकरला बाद केले.
बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा तीनशे धावांचे शिखर उभे केले आहे. याआधी त्यांनी 2015 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 315 धावांची कामगिरी केली होती. दुसरीकडे आफ्रिकेने 14व्यांदा 300 पेक्षा अधिक धावा करण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला दिली आहे आणि त्यांना केवळ एकच विजय मिळवता आलेला आहे. महमदुल्लाहने नाबाद 46 धावांची खेळी केली. वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम कामगिरी 2011 मध्ये केली होती. त्यांनी नागपूर येथील सामन्यात भारताने ठेवलेले 297 धावांचे लक्ष्य पार केले होते. पण, आता त्यांच्यासमोर 330 धावांचे लक्ष्य आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 328 धावा या यशस्वीपणे पाठलाग करण्याचा विक्रम आयर्लंडने 2011मध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता. त्यामुळे आज आफ्रिकेने बांगलादेशने ठेवलेलं लक्ष्य पार केल्यास या विक्रमात ते अव्वल स्थान घेतील हे नक्की.
Web Title: ICC World Cup 2019 : South Africa have never chased down more than 297 in a Cricket World Cup match, will they do today?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.